३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनास पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार संदेश

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्धल १ तारखेपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपला संदेश देणार असून त्याचे प्रक्षेपण कार्यक्रमात केले जाणार आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृति मंत्री जी किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर, मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. मंगळवार ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय १ जून ते ६ जून या काळात किल्ले रायगड व्यतिरिक्त पाचाड, तसेच गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ जून ते ७ जून या काळात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने देखील सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

सोहळ्यानिमित्त राज्यात वर्षभर विविध कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची निर्मिती, राज्यात अकृषिक विद्यापीठस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, तज्ज्ञ समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित साहित्य आणि संदर्भ साहित्याचे डिजिटायझेशन हे उपक्रमपार पडणार आहेत