क्रिकेटर पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला, गाडीच्या काचा तोडल्या; ८ जणांविरुद्ध मुंबई पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलबाहेर पृथ्वी शॉची कार समजून त्याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी बुधवारी (१५ फेब्रुवारी) ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या गाडीवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी गाडीचा पाठलाग करून पैसे न दिल्याने खोटा गुन्हा दाखल (Prithvi Shaw Selfie Controversy) करण्याची धमकी दिली.

नेमके काय आहे प्रकरण
पृथ्वी शॉ सांताक्रूझ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता, तेव्हा काही चाहत्यांनी त्याच्याजवळ जाऊन सेल्फीची मागणी केली. शॉने दोन लोकांसोबत सेल्फीही काढले. पण पुन्हा तोच ग्रुप परतला आणि त्यांनी इतरांसोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वी शॉने यावेळी आपण मित्रांसोबत जेवायला आलो असून त्रास देऊ नका असे सांगत सेल्फी देण्यास नकार दिला. तक्रारीनुसार, त्या चाहत्यांनी अधिक आग्रह केला असता पृथ्वी शॉच्या मित्राने हॉटेल व्यवस्थापकाला फोन करून त्यांची तक्रार केली.

परिणामी व्यवस्थापकाने त्या चाहत्यांना हॉटेलबाहेर जाण्याल सांगितले. पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र रात्रीचे जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा हॉटेलबाहेर काही लोक बेसबॉलच्या बॅट घेऊन उभे होते. आरोपींनी त्यांच्या कारची काच फोडली. यावेळी पृथ्वी शॉदेखील कारमध्ये उपस्थित होता. आम्हाला कोणताही वाद नको होता म्हणून आम्ही पृथ्वी शॉला दुसऱ्या कारने घरी पाठवले, असे तक्रारीत म्हटले आहे.

पुढे जोगेश्वरीतील लोटस पेट्रोल पंपाजवळ पृथ्वी शॉच्या मित्राची गाडी आरोपींद्वारे अडवली गेली. मग एक महिला त्यांच्या गाडीजवळ आली आणि म्हणाली की हे प्रकरण सोडवायचे असेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा खोटे आरोप करुन तुमच्याविरोधात तक्रार दाखल करू.

या घटनेनंतर तक्रारदार सुरेंद्र यादव यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी शॉसोबत सेल्फी घेतलेल्या लोकांची नावे आणि संपर्क क्रमांक काढून पोलिसांना दिले. सना उर्फ ​​सपना गिल आणि शोभित ठाकूर अशी दोघांची नावे आहेत.