अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील; पृथ्वीराज चव्हाण यांची खोचक टीका

kolhapur  – शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

हिना कैसार अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन्ही मुलींची नावे आहेत.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी याबाबत एक चित्रफीत जाहीर करून हा नाहक बदनाम करण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली.

दरम्यान, आता या आरोपानंतर सत्तारांवर काँग्रेसकडून टोलेबाजी सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सत्तारांवर खोचक टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना त्यांना टीईटी घोटाळ्याबद्दल विचारलं. यावेळी टीईटी घोटाळा प्रकरणी मुलांची नावं समोर आल्याबाबत बोलताना चव्हाण यांनी म्हटलं आहे की, अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील.