चंद्रपूर जिल्ह्यातल्या वाळू माफियांवर गोंड पिंपरीचे परिविक्षाधीन तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांची धडाकेबाज कारवाई

चंद्रपूर (गोंडपिंपरी) : नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध अशा चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना कुणी रोखणारे आहे की नाही ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.याला आता एक समर्पक उत्तर मिळालं आहे.जिगरबाज – धडाकेबाज असे तरुण परिविक्षाधीन अधिकारी अविनाश शेंबटवाड.

शेंबटवाड हे गेल्या वर्षीच गोंडपिंपरी तालुक्यात परिविक्षाधीन तहसीलदार आणि निवासी नायब तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत.कामाचा जोरदार सपाटा लावत अनेक धडाकेबाज कारवाया करून त्यांनी स्वतःची एक वेगळीचं इमेज निर्माण केली आहे.

सोमवारी (दि.६) रात्री साधारण पावणे तीनच्या सुमारास त्यांनी गोंडपिंपरी तालुक्यातील अंधारी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.

शेंबटवाड यांची नुकतीच अवैध गौण खनिज उत्खनन थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ३ मार्च रोजी देखील त्यांन मध्यरात्री अंधारी नदी पात्रातील कुलथा घाटावर धडक कारवाई करत येथून एक जेसीबी, हायवा व एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेती उत्खनन करताना जप्त केला.
तसेच ६ मार्च रोजी केलेल्या कार्यवाहीत एक हायवा जप्त केली आहे.

तहसीलदार शेंबटवाड यांना गुप्त खबऱ्यांमार्फत तालुक्यातील अंधारी नदी पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. यावरून मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली.यावेळी नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन सुरू होते.

ह्या कारवाईमुळे तालुक्यात सर्वत्र या दबंग तहसीलदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या कारवाईच्या वेळी एपीआय जीवन राजगुरू देखील उपस्थित होते.जप्त वाहने तहसील कार्यालय,गोंडपिंपरी येथे जमा करण्यात आली आहेत. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.