केंद्राच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करा – खा. रामदास तडस

वर्धा :- केंद्र शासनाच्यावतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येते. या योजनांची जिल्ह्यात योग्य प्रकारे अंमलबजावणी व विविध योजनेच्या निधीतून विकासाची चांगली कामे करा, असे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात तडस यांच्या अध्यक्षतेखाली समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आ. रामदास आंबटकर, आ. दादाराव केचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यजित बढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, माधव कोटस्थाने यांचेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्ष, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. या योजनांचा विभागनिहाय खा. तडस यांनी आढावा घेतला. केंद्राच्यावतीने घरकुल, पेयजल कार्यक्रम, कृषि सिंचन योजना, पिकविमा योजना, ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कौशल्य विकास कार्यक्रम, शालेय पोषण आहार आदी विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविल्या जाते. या कार्यक्रमांचा योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे. योजनेअंतर्गत जिल्ह्याला प्राप्त होणारा सर्व निधी खर्च झाला पाहिजे. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे, असे श्री तडस यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना सांगितले.

विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, निराधारांना अनुदान वाटप करणे, भुमि अभिलेख्यांचे स्कॅनिंग, पटटे वाटप, आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती, सार्वजनिक शौचालयांसाठी पाण्याची व्यवस्था आदींबाबात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आर्वी ते तळेगाव रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. यावेळी आ. आंबटकर व आ. केचे यांनी केलेल्या सुचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही खा. तडस यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.