बैलगाडा शर्यतींना स्थगिती : शिवाजीराव आढळराव-पाटलांच्या समोरच महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्या नंतर आता बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी राजकीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. बैलगाडा शर्यत ही अनेकगावांची परंपरा आहे. अनेक वर्षे चाललेल्या या लढाईत अखेर विजय मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान, काही वर्ष ही परंपरा कोर्टांने बंदी घातल्यामुळे बंद पडली होती आता ती पुन्हा चालू होणार असल्याने बैलगाडा मालकांसह नागरिकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत असतानाच कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी – लांडेवाडी आणि मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकणमधील आज (ता. १) होणाऱ्या बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

शासनाकडून नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये धार्मिक आणि सामाजिक नागरिकांची जास्तीतजास्त 250 नागरिक उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शर्यतीदरम्यान 250 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे अनेकजण नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अचानकपणे बैलगाडा शर्यत रद्द केल्याने , बैलगाडा प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णया विरोधात घाटात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यावेळी बैलगाडा शर्यत स्थगितीच्या आदेशानंतर शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी बैलगाडा मालक चालकांच्या सोबतीने बैलगाडा घाटात ठिय्या मांडला. यावेळी त्यांच्या समोरच समर्थकांनी महाविकास आघाडी आणि जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटीलही आंदोलनास बसले आहेत.

बैलगाडा स्थगितीची माहिती आम्हाला काल सायंकाळी सहा वाजता दिली असती तर काय झाले असते. या शर्यतीसाठी सातारा ,जत, सांगली आष्टी, अहमदनगर येथून बैलगाडा मालक आले आहेत. शर्यतीची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर शर्यतीला अवघे काही तास उरले असताना प्रशासनाने ही स्थगित दिली आहे.

जर मागील तीन दिवसांपासून पोलीस प्रशासन इथे येऊन पाहणी करतेय. सर्व तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने आम्ही संपर्कात होतो. मात्र तरीही आम्हाला माहिती न देता रात्री शर्यतीला स्थगिती दिली जातेय, असे का ? दुसरीकडं पुणे जिल्ह्यातच भीमा -कोरेगाव येथील शौर्य दिन साजरा होत आहे त्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येतेय मग बैलगाडा शर्यतीला का नाही ? असा सवाल आढळराव पाटील यांनी विचारला आहे. टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.