…अन्यथा ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसणार, आमचा संयम आता संपलाय; आझाद मैदानावर आंदोलक आक्रमक

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

उपोषणाला बसलेल्या संभाजी छत्रपती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाही आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले आहेत. संभाजीराजे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर चर्चा करण्याची किंवा सरकारसोबत बैठक करण्याची गरज नाही. सरकारने थेट पत्र घेऊनच आझाद मैदानात यावे, असं सांगतानाच आता आमचा संयम संपला आहे. आम्ही शांत बसणार नाही. या तीनचाकी सरकारचा आम्ही निषेध करतो. संध्याकाळपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बंगल्यात घुसू, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि रमेश खैरे-पाटील यांनी ही आक्रमक भूमिका मांडली आहे.