पुणे : विमान प्रवाशांसासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाच लाख चौरस फुटांचे टर्मिनल उभे राहणार

पुणे : पुण्यातून विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने होणारी वाढ आणि सध्याच्या इमारतीत गर्दी कमी करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पाच लाख चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. ते यावर्षी वापरासाठी खुले होईल.

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. खासदार बापट यांनी नुकतीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळ विस्तारीकरणाबाबत निवेदन दिले होते.

अत्याधुनिक नवीन इंटीग्रेटेड टर्मिनल हे पूर्णत: वातानुकूलित असेल. प्रतिवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावण्याची त्याची क्षमता असेल. यात गर्दीच्यावेळी 2 हजार 300 प्रवाशांना (1 हजार 700, देशांतर्गत आणि 600 नग आंतरराष्ट्रीय सेवा देता येईल. या इमारतीत प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज), 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर), 15 लिफ्ट, 34 चेक-इन काउंटर, प्रवासी सामान वहन यंत्रणा, आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्टसह आदी अद्ययावत सुविधा इमारतीत असतील.

नवे टर्मिनल हे पर्यावरणपूरक असेल. त्यात खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था तसेच सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे असतील. पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारी त्याची रचना असेल.

टर्मिनलचे बांधकाम हे 2018 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यातील 61 टक्के काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट 2022 पर्यंत ते पूर्ण होईल. विमानतळावर पार्किगसाठी जागेची कायम समस्या राहिली आहे. नव्या इमारतीमुळे त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघेल. त्यासाठी 120 कोटी रुपये खर्च करून चार मजली आणि दोन मजले बेसमेंट असलेली इमारतही बांधण्यात येत आहे. त्यात 1024 वाहनांचे एकावेळी पार्किंग करता येईल. नव्या इमारतींमध्ये प्रवाशांचे मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी देखील 15 हजार चौरस फूट जागा देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील प्रवाशांना अनुकूल असे हे नवे टर्मिनल असेल.

गिरीश बापट यांनी सांगितले, की सध्याच्या विमानतळावरील टर्मिनल केवळ 22 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांची आणि विमान कंपन्यांची मोठी गैरसोय होते. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 80 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज टर्मिनलची गरज होती. ती आता पूर्ण होईल.

पुण्यातील लोहगाव विमानतळ हे महाराष्ट्रात महत्त्वाचे विमानतळ आहे. भोवतालच्या दहा जिल्ह्यांना ते जोडणारे आहे. तसेच पुणे आणि परिसरात उद्योगांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना चांगली सुविधा देणारे टर्मिनल गरजेचे होते. म्हणून या विमानतळ विस्तारीकरणासाठी गेली तीन वर्षे प्रयत्नशील आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांचा विमान प्रवास अधिक सुखकर होईल.

कार्गो सुविधेसाठी आवश्यक असणारी वायुदलाची अडीच एकर जागा (एक रुपया नाममात्र दराने) उपलब्ध करून देण्यात तसेच तेरा एकर बी. एस. ओ. ची जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित खात्याकडे गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. परंतु या जागा उपलब्ध होत नव्हत्या. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, ज्योतीरादित्य सिंधिया यांच्याकडे खासदार बापट यांनी वारंवार बैठका करून त्या मिळवून घेतल्या.अशी माहिती देखील बापट यांनी दिली.