Pune : ऑटोरिक्षा मीटर पुनःप्रमाणीकरण न केलेल्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे (Regional Transport Authority Pune) यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केलेली आहे. ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता मुदतवाढ देऊनही पुन:प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास सुरुवातीस १ ते ३० नोव्हेंबर आणि नंतर १ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला होता.

मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान ७ दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी १ दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी ४० दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रूपये मात्र किमान ५०० रूपये आणि कमाल तडजोड शुल्क २ हजार रूपयांपर्यंत असेल. मीटर तपासणीचे काम फुले नगर व आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे सुरूच राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.