पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळं जिल्ह्यातील जवळपास 443 गावांतील नागरिकांच्या लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्यामुळे या गावांचं 100 टक्के लसीकरण झालं आहे. वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा दर घटला आहे तसंच मृत्यूदरातही घट झाली आहे.
यामुळे पुणे जिल्ह्याची वाटचाल 100 टक्के निर्बंधमुक्तीकडे होत आहे. पुणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसंच आरोग्य विभागातर्फे लसीकरणासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत 1 कोटी 30 लाख जणांचे लसीकरण पूर्ण झालं आहे.
राज्यात लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 16 नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत जिल्ह्यातील 443 गावांत लसीकरण 100 टक्के पूर्ण केल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वाधिक मुळशी तालुक्यात 134 गावांचं 100 टक्के लसीकरण झालं आहे.
वेल्हे तालुक्यात 54, भोरमध्ये 41, तर इंदापूर तालुक्यात 38 गावांचं शंभर टक्के लसीकरण झालं आहे. जुन्नर आणि पुरंदरमध्ये लसीकरण झालेली गावं सर्वात कमी असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
https://youtu.be/FkhUTw1OjTM