‘वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक ऐक्य बिघडवणाऱ्या संभाजी भिडे यांना पुणे जिल्हा बंदी करावी’

पुणे – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता याच महाशयांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संभाजी महाराज बलिदानासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना भिडे यांनी यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भिडे म्हणाले, आज संभाजी महाराज नाहीत, औरंगजेबही नाही. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही शिल्लक आहे. परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करलं परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तान मध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय.

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे सचिन खरात यांनी भिडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संभाजी भिडे यांनी शिरूर तालुक्यातील मांडणगाव फराटा येथे वादग्रस्त विधान केले आहे यापूर्वी याच जवळच्या भीमा कोरेगाव येथे दंगल झाली होती पण याच भागात येऊन वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. या भागातील जनता गुण्या गोविंदाने राहत असताना बेजबाबदार आणि तोंडाळ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे या विधानामुळे सामाजिक ऐक्य बिघडू शकते म्हणून संभाजी भिडे यांना पुणे जिल्हा बंदी करावी अशी मागणी महाविकासआघाडी सरकारला करत आहे.असं खरात म्हणाले.