Pune : नागपुरात पराभव दिसू लागल्याने फडणवीसांची पुण्यात चाचपणी – रुपाली पाटील ठोंबरे

पुणे – भाजपाने (BJP) नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. याबाबत फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य केले आहे. (NCP Rupali Patil Thombare facebook post). देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचा दावा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक आहे, अशाप्रकारचे ज्ञान महाराष्ट्राला देणारे, फसवणीस पणा आणि अकार्यक्षमता यामुळे भाजपाने मुख्यमंत्री पदी नाकारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे म्हणून नागपूरमध्ये (Nagpur) पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे ?, असे रुपाली पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुणेकर (Punekar) जनता हुशार आहे. कुठलंही कर्तृत्व नसताना वडील व चुलतीच्या अर्थातच घरणेशाहीच्या पुण्याईवर स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या पक्षातील बहुजन नेत्यांना राजकारणात संपवून, सत्तापदे मिळवणाऱ्यांना शिवजन्मभूमी पुणेरी विसर्जन करायला आतुर आहे, असेही रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे.