पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ देशातील महापौरांना सांगणार ‘स्वच्छ भारत मिशन’चा अनुभव !

पुणे – पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर म्हणून पुण्याचा देशात डंका आहे. हा धागा पकडून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देशातील महापौरांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामगिरीचा अनुभव सांगणार आहेत. निमित्त आहे केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत आयोजित केलेल्या देशातील महापौरांच्या परिषदेचे. विशेष म्हणजे देशातील केवळ दोन महापौरांनाच यात अनुभव सांगण्याची संधी मिळाली असून त्यात महापौर मोहोळ यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाने वाराणसी येथे ‘न्यू अर्बन इंडिया’ अंतर्गत देशातील महापौरांची परिषद शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी आयोजित केली असून यात देशभरातील महापौरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. शिवाय पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वच्छ भारत मिशनवर तर सुरतच्या महापौर हेमाली बोघावाला या ‘अमृत’ योजनेचे सादरीकरण करणार आहेत. या दोन्ही महापौरांची निवड थेट केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने केली आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘देशाच्या महापौरांसह केंद्रीय नगरविकास मंत्र्यांसमोर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पुणे शहराने केलेल्या कामाची माहिती देण्याची संधी मिळाली, हा पुणेकरांचा सन्मान आहे. शिवाय शहर स्वच्छतेसाठी राबणाऱ्या १५ हजारांपेक्षा जास्त स्वच्छ सेवकांचे हे यश असून हा त्यांचाही सन्मान आहे, याचे मनस्वी समाधान आहे. देशातील महापौरांसमोर प्रेझेन्टेशन देणार असून यात पुणे शहराने कशी कामगिरी केली याची सविस्तर माहिती देणार आहे.’

‘भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महापालिकेची सत्ता आली तेव्हा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. शिल्लक राहणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. अशातच आम्ही जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया कशी होईल, यासाठी यंत्रणा उभी करण्याकडे विशेष लक्ष दिले. याचेच सकारात्मक परिणाम म्हणून कचरा प्रक्रिया करण्यात पुणे महानगरपालिका स्वयंपूर्ण झाली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.