भावी नगरसेवकांचे लाखो रुपये पाण्यात, प्रभाग रचना रद्द !

पुणे : येत्या काही दिवसांत राज्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता होती, त्यानुसार तीन सदस्यांची प्रभागरचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच भावी नगरसेवकांना मोठा धक्का लागला आहे. सोमवारी राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना पुन्हा एकदा रद्द झाली. नगरसेवक व इच्छुक उमेदवारांकडून प्रारूप प्रभागरचनेवरून निवडणुकीची तयारी सुरू केली असताना आता प्रभाग रद्द झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नव्याने प्रभाग रचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण टाकले जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे आरक्षण कायम असावे अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यामुळे नुकताच विधिमंडळात नवीन कायदा पारित झाला. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला दिले होते. तीन सदस्यांचा प्रवास करताना अनेक नाट्यमय घडामोडी पुणे शहरात घडल्या होत्या. स्वतःच्या सोयीचा प्रभात तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. प्रारुप प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांचे घर गाठल्याची चर्चा ही रंगली होती.