Pune News | मंदिर तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही, काशी-अयोध्या-मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकिलांचे वक्तव्य

Pune News | एकदा एखाद्या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली तर काळाच्या शेवटपर्यंत तिथे मंदिराचेच अस्तित्व असते. तिथे देवता अप्रत्यक्षपणे विराजमान असतात. शिवलिंग किंवा मंदिर तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या केस मध्ये हिंदू देवतेला जिवंत मानून आपला न्याय दिला आहे. आपल्या अप्रत्यक्ष देवतेला स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे, असे मत काशी- -अयोध्या -मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन यांनी व्यक्त केले.

हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ गौरविण्यात आले. स. प. महाविद्यालयातील (Pune News) लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम झाला. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, समितीचे तुषार दामगुडे, शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, निलेश भिसे, चंद्रभूषण जोशी, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले उपस्थित होते.

मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्याकरिता आणि आचार्य के. आर. मनोज यांना धर्म जागरण करिता देण्यात आला. तसेच कै. शरद मोहोळ यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार स्वाती मोहोळ यांनी स्वीकारला आणि अनंत करमुसे यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोदंडदारी श्रीरामाची अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त करणारी वीरश्रीयुक्त मूर्ती, दहा हजार रुपये रोख आणि पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष आहे. गडचिरोली भागात वनवासी जनजातींसाठी कार्य करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिर्के यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका यावेळी प्रदान करण्यात आली.

ॲड. विष्णू जैन म्हणाले,२२ जानेवारी २०२४ हा सनातनींसाठी अभूतपूर्व दिवस होता. या दिवशी आपले आराध्य रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. राम मंदिर हे आस्थेच्या आधारावर मिळाले नाही तर तिथे अनेक ऐतिहासिक पुरावे मिळाले आहेत त्या आधारावर मंदिर निर्मितीसाठी न्याय मिळाला आहे. मंदिर तोडून दिल्यामुळे देवतेचे अस्तित्व संपत नाही.

राम मंदिराच्या लढाईच्या वेळी शपथ घेण्यात येत होती की मंदिर वही बनायेंगे हे  वचन होते ते आपल्या भक्ताचे देवाप्रती. अशाच प्रकारे मथुरा आणि ज्ञानव्यापी यांच्यासह देशातील अनेक मंदिरासाठींची लढाई बाकी आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप