Pune News | कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन

Pune News | कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 18) अभिवादन करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरासमाारील राणी लक्ष्मीबाई यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास कऱ्हाडे ब्राह्मण महासंघासह विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींच्या आरएसपी, बँड तसेच ढोल-ताशा पथकाने मानवंदना दिली. ‌‘वंदे मातारम्‌‍‌’, ‌‘भारत माता की जय‌’, ‌‘झाँसी की राणी अमर रहें‌’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

शिवाजीनगर (Pune News) येथील बालगंधर्व रंगमंदिरासमोर कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सहकार्याने राणी लक्ष्मीबाई यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महापालिकेच्या सहकार्याने या अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरिभाऊ मुणगेकर, सचिव बळवंत भाटवडेकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, सदस्य डॉ. राजश्री महाजनी, विजय पानवलकर, दीपक भडकमकर तसेच समाजसेवक मिलिंद एकबोटे, डॉ. नंदकिशोर एकबोटे, भाजपाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या युवा समिती उपाध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटे, मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया नाईक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता.

महापालिकेची अनास्था : नागरिकांची नाराजी
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आयोजित कार्यक्रमादरम्यान राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी महापालिकेतर्फे सुरुवातीस अभिवादन केले जाते. त्यानंतर विविध संस्था, संघटना राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करतात. ही प्रथा गेली अनेक वर्षे सुरू आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उद्वाहकाची व्यवस्था केली जाते. पण आज अचानक ही सुविधा उपलब्ध होणार नाही, असे कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐनवेळी देऊन पुतळ्याऐवजी तेथील नामफलकाला पुष्पहार अर्पण करावा, असे सांगितले. पुष्पहार अर्पण करण्याची सुविधा दिली जाईल, असे आश्वासन देऊन सुविधा उपलब्ध न केल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. जो पर्यंत उद्वाहकाची सुविधा उपलब्ध होत नाही तो पर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर प्रशासनाने तब्बल एक तासानंतर सुविधा उपलब्ध करून दिली. अभिवादन सोहळ्यात महापौर किंवा महापालिका आयुक्त यांची उपस्थिती असते. मात्र सध्या महापालिकेवर प्रशासक असल्याने महापालिकेचे आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
या विषयी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर म्हणाल्या, राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून अभिवादन करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहकार्यातून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. या उपक्रमासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला जातो. या वर्षीही तसा पत्रव्यवहार करण्यात आला. पण ऐनवेळी सुविधा उपलब्ध करून देता येणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात राणी लक्ष्मीबाई यांचीही मोलाची भूमिका आहे. अशा महान क्रांतिकारक महिलेविषयी अनास्था दाखविणे योग्य वाटत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी दिनी हार अर्पण करण्याची प्रथा आहे, असे सांगून ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 9 वाजता उद्वाहक येथे असणे अपेक्षित होते. सुरुवातीस अधिकाऱ्यांनी सुविधा उपलब्ध होईल, असे सांगितले मात्र त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिक, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. महापालिकेने वेळेत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने अनेकांना अभिवादन न करता परतावे लागले. अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुतळ्याची स्वच्छता व सुशोभिकरणही केले जाते मात्र यंदा हे काहीही करण्यात आलेले नाही. महापालिकेच्या या कृतीचा निषेध म्हणून उद्या महापालिका आयुक्तांना निषेधाचे पत्र देणार आहोत.

राणी लक्ष्मीबाई पहिल्या महिला क्रांतिकारकांपैकी एक : डॉ. सच्चिदानंद शेवडे
अभिवादन सोहळ्यानंतर मॉडर्न गर्ल्स हायस्कूल येथे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‌‘झाशीच्या राणीचा इतिहास‌’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण अशा राणी लक्ष्मीबाई या भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारकांपैकी एक समजल्या जातात. लहानपणापासूनच त्या दांडपट्टा, घोडेस्वारी, तलवारबाजी, घोडेपरिक्षा यात निष्णात होत्या. त्यांच्या विवाहानंतर मनकर्णिकेची झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली. त्यांनी नात्यातील एक मुलगा दत्तक घेतला, परंतु ब्रिटिश राजवटीत हे दत्तक विधान अमान्य झाले व झाशीची सर्व संपत्ती सरकार जमा झाली. अशा काळात राणीने व्यवस्थेविरुद्ध बंड केले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1857 साली जे बंड झाले त्यात राणी लक्ष्मीबाई यांचा सहभाग व पाठींबा होता. राणीने ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या युद्धप्रसंगी त्यांना अनेकदा पेचात अडकविले. राजनिती खेळत शत्रूला गाफील ठेवत बंडाची तयारी केली आणि झाशीचा किल्ला सुरक्षित ठेवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु त्यात राणीला यश आले नाही. तरी देखील त्या काळात ब्रिटिशांनी हे मान्य केले की, आमच्या विरुद्ध केलेल्या बंडात सर्वांत शूरपणे लढली ती फक्त राणी लक्ष्मीबाई होती.

या प्रसंगी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, उपाध्यक्ष गिरीश शेवडे, हरिभाऊ मुणगेकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे, मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका डॉ. उज्ज्वला हातागळे उपस्थित होते. प्रास्ताविक माया नाईक यांनी केले तर आभार डॉ. उज्ज्वला हातागळे यांनी मानले. उपस्थितांचा सत्कार डॉ. नंदकिशोर एकबोटे, माया नाईक यांनी केला. सूत्रसंचालन सहशिक्षिका सुधा पवार यांनी केले. कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे शाळेला राणी लक्ष्मीबाई यांचे छायाचित्र भेट देण्यात आले.

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे मंगळवारी (दि. 18) रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मॉडर्न हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी भगवा ध्वज हाती घेऊन झाशीच्या राणीचा जयघोष केला.

रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अभिवादन करताना ज्योत्स्ना एकबोटे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, डॉ. राजश्री महाजनी.

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे (मंगळवारी) रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मॉडर्न हायस्कूलमध्ये डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‌‘झाशीच्या राणीचा इतिहास‌’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like