‘एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’

'जनाची नाही तर मनाची तरी ठेवा'

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत विवाहबंधनात अडकत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. यामुळेच या हायप्रोफाईल विवाह सोहळ्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने नुकताच संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात संजय राऊत यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान,हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता’, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारला केलाय.TV9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी देखील यावरून टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, दारू वरची एक्साईज ड्युटी 50% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना काही पडली नाही कोणाची. असं म्हणत राणे यांनी जोरदार टीका केली आहे.