देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी दिलेली नोटीस म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा : विखे-पाटील

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिसांनी जबाब नोंदवला आहे.

या सर्व प्रकारानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. पोलिसांनी दिलेल्या नोटीस संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यातील बदल्‍यांच्‍या संदर्भात भ्रष्‍टाचार उघड केल्‍याबद्दल पोलिसांनी दिलेली नोटीस म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा अशीच परिस्थिती महाविकास आघाडीची आहे.

भ्रष्‍टाचाराच्‍या विरोधातील लढाईत फडणवीसांच्‍या पाठीशी भाजपच्या कार्यकर्त्यांसह राज्‍यातील जनता खंबीरपणे उभी राहील. महाविकास आघाडी सरकारच्‍या कृत्‍याचा निषेध करतानाच महाविकास आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍टाचाराची पाळेमुळे उखडून टाकण्‍यासाठीची लढाई अधिक तीव्र करण्‍याचा इशारा त्‍यांनी दिला.