पवार-विखेंच्या गप्पा इतक्या रंगल्या की राम शिंदेंनी कंटाळून कल्टी मारली !

अहमदनगर : पवार-विखे यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे. दोन्ही कुटुंबातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नुकतेच संसदेत खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुजय विखे यांच्यात झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय बनला होता. मात्र सोमवारी रात्री नगर जिल्ह्यात अगदी याच्या उलट चित्र पाहायला मिळालं.

भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची कर्जत येथील गोधड महारांचा पालखी सोहळ्या निमित्ताने दोघांची भेट झाली. त्यावेळी अनेक दिवसांनी भेटल्यानंतर ब-याच गप्पा रंगल्या होत्या. या दोन राजकीय नेत्यांच्या गप्पा पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या भुवया उंचावल्या. या नेत्यांमध्ये गप्पा इतक्या रंगल्या होत्या की या गप्पांना कंटाळून माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी तिथून निघून जाणेच पसंद केले.

महाराष्ट्रातल्या राजकारणात रोज नवा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलं गरम आहे. हल्ली नेत्यांची वक्तव्य म्हणजे फक्त शिव्यांची लाखोली इतकेच उरले आहेत. अशात यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या राजकारणात सध्या दोन वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांनी असे दिलखुलासपणे संवाद साधने दुर्मिळ झाले आहे. अशात हे चित्र सुसंस्कृत राजकारण्याला थोडा तरी दिलासा देऊन जाईल हे नक्की.