भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय आहेत – नाना पटोले

मुंबई – काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई व महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिराजी, राजीवजी यांना ताकद दिली आहे. आजपासून सुरु झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे असे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते आज काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम, संदीप, सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, खजिनदार डॉ. अमरजीत सिंह मनहास, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे , मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई, मोहन जोशी, कमांडर कलावत, देविदास भन्साळी, भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रमोद मोरे, राजेश शर्मा, राजन भोसले, रामचंद्र आबा दळवी, मनोज शिंदे, जोजो थॅामस, ब्रिजकिशोर दत्त, भावना जैन, व्हीजेएनटी विभागाचे अध्यक्ष मनोज जाधव, माजी आ. सुभाष चव्हाण, हुस्नबानो खलिफे, प्रवक्ते अरुण सावंत, सचिव झिशान अहमद, आनंद सिंग, विश्वजीत हाप्पे, आदी उपस्थित होते.

मुंबईसोबत राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते गडचिरोली येथे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात, कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या हस्ते तर अमरावती येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणीचा शुभारंभ झाला.

यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की, मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस १० लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुलजी गांधी २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, देशाचे संविधान आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्या पासून संविधान आणि पर्यायाने देशाला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देश वाचवायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत लोकांना काँग्रेससोबत जोडले पाहिजे.

यावेळी बोलतना चंद्रकांत हंडोरे म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचे सरकार आले तरच देशात लोकशाही आणि संविधान अबाधित राहील त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा.

गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात असून काँग्रेसला नेहमी त्यांनी साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी करणे गरजेचे असून गावा गावात जाऊन काँग्रेचे सदस्य नोंदणी करा व पक्षाची ताकद वाढवा. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फक्त राहुल गांधी हेच पर्याय आहेत. भाजपचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकते. त्यामुळे राहुलजी गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी मोठ्या संख्येने सदस्यनोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.