राहुल गांधी निघाले पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर; पंजाबमधील सभा रद्द करण्याची पक्षावर नामुष्की

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष सध्या वाईट टप्प्यातून जात असताना पुन्हा एकदा खा. राहुल गांधींचा विदेश दौरा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. पंजाबसह 5 राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी ज्या पद्धतीने परदेश दौऱ्यावर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यामुळे काँग्रेस पक्षाला ३ जानेवारीला पंजाबमधील मोगा येथे होणारी सभा रद्द करावी लागली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू वादामुळे काँग्रेसमधील भांडण ज्याप्रकारे वाढले आणि त्यानंतर मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि सिद्धू यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. अशा परिस्थितीत पक्षाला मोगा रॅलीकडून मोठ्या आशा होत्या. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाला मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये एकता दाखवायची होती. मात्र सर्व तयारी पाण्यात गेली आहे.आता राहुल 15 जानेवारीला पंजाबमध्ये रॅली करणार आहेत आणि 16 जानेवारीला गोव्यात रॅली करू शकतात.

परदेश दौऱ्यावर काँग्रेस पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे.काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे की, राहुल गांधी वैयक्तिक दौऱ्यावर गेले आहेत. भाजप आणि त्यांच्या मीडियातील मित्रांनी विनाकारण अफवा पसरवू नये. दरम्यान, राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याचा प्रश्न पहिल्यांदाच उपस्थित झाला आहे, असे नाही. याआधीही असे अनेक प्रसंग आले आहेत की, राहुल गांधी अचानक परदेश दौऱ्यावर गेल्याने पक्षाची नाचक्की झाली आहे.

याआधी राहुल गांधी डिसेंबर 2020 मध्ये काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त परदेशात गेले होते.ऑक्टोबर 2019 मध्ये, हरियाणा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या 15 दिवस आधी, ते परदेश दौऱ्यावर गेले होते. 2019 मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या निदर्शनांदरम्यान ते परदेशात गेले होते. कर्नाटक निवडणुकीनंतर राहुल गांधी परदेशात गेले होते. 2014 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनातही राहुल गांधी काही काळासाठी परदेशात गेले होते.