डीईएसच्या ११० एकर कॅम्पसवर रेनवॉटर हार्वेस्टिंग

पाणी बचत विषयातील सर्वात शिक्षण संस्थेचा सर्वात मोठा प्रकल्प

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) फर्ग्युसन रस्त्यावरील ११० एकर कॅम्पसवर पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प (रेनवॉटर हार्वेस्टिंग) राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी कळविली आहे.

डीईएस आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन या स्वयंसेवी संस्थेचे सहाय घेण्यात येणार आहे. डीईएसच्या वतीने डॉ. कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्रकल्पाचे प्रबंधक सुनील भिडे, कार्यकारी अभियंता नीरज पूर्णपात्रे, कमिन्स इंडियाच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभागाच्या प्रमुख सौजन्या वेगुरू, पंकज कुलकर्णी, शिवदुर्गचे पंडित अतिवाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुंटे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती भागात टेकडीसह ११० एकरचा फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर असून, दुर्मीळ वनस्पतींचा समावेश असणारे बोटॅनिकल गार्डन आहे. दरवर्षी सरासरी ८०० मिमि पावसाचा अंदाज धरल्यास या परिसरात ३५ कोटी लीटरहून अधिक पाणी वाहून जाते. या प्रकल्पामुळे या पाण्याचा पुनर्वापर करता येणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. माती वाहून जाऊ नये यासाठी गवताची लागवड केली जाणार आहे. त्यानंतर बोटॅनिकल गार्डनसह सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल. त्यामध्ये आणखी काही दुर्मीळ वृक्षांचा समावेश असेल. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या स्वरूपात हरित क्षेत्र विकसित झाल्याने शहराचे प्रदूषण आणि तापमान कमी होण्यास मदत होणार आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरा हजारहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून समाजात पर्यावरण, पाण्याची बचत याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. पाणी बचत या विषयात कुठल्याही शैक्षणिक संस्थेने हाती घेतलेला हा मोठा प्रकल्प आहे.

वेगुरू म्हणाल्या, शिक्षण, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र या क्षेत्रात कमिन्स इंडिया फाउंडेशन सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत आहे. डीईएससारख्या ऐतिहासिक शिक्षण संस्थेबरोबर पाणी बचत क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे हा भाग्याचा क्षण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक मदत कमिन्स करणार आहे. तीन वर्षांसाठी हा करार आहे. तो पुढे वाढवला जाईल. उत्तम प्रकारचा नैसर्गिक अधिवास या ठिकाणी विकसित होईल असा विश्‍वास वाटतो. या हरित परिसराचा उपयोग संपूर्ण शहराच्या पर्यावरणासाठी होणार आहे.

गेली दोन वर्षे या प्रकल्पावर प्राथमिक काम सुरू आहे. हरित क्षेत्र निर्माण करण्यासाठी पाण्याची गरज आहे. खुल्या विहिरी तयार करणे, परिसरातील १५ बोअरवेल मधील गाळ काढून त्या कार्यान्वित करणे, टेकडीवर चर खोदणे, खोल चर घेणे, गॅबियन स्टॅक्चर निर्माण करणे, शोषण खड्डे घेणे अशा शास्त्रीय उपाययोजना या प्रकल्पांतर्गत केल्या जाणार आहेत. त्यासाठी परिसर हरित करण्यासाठी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी आवश्यक असणारी पाण्याची गरज भागणार आहे. त्याबरोबर प्रत्येक विभागाची गरज लक्षात घेऊन पाणी वापराचे ऑडिट, बॅलन्सशीट तयार केले जाईल, पाण्याचा गरजेनुसार वापर व्हावा यासाठी उपायोजना केल्या जातील.
सुनील भिडे, प्रबंधक

तिकोना, धर्मवीर, रोहिडेश्‍वर, राजगड, तुंग, रायरेश्‍वर या किल्ल्यांवरील निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहे. या क्षेत्रातील संस्थेचा कामाचा अनुभव दांडगा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन परिसर हिरवागार करण्यासाठी आम्ही शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणची पाण्याची गरज या प्रकल्पामुळे भागू शकेल असा विश्‍वास वाटतो.
पंडित अतिवाडकर