भावी मुख्यमंत्री राज ठाकरे… शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

मुंबई :  गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa)  शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे.. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे (Raj Thackeray) अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

दरम्यान,मनसेच्या शिवसेना भवनासमोरील काही पोस्टरमध्ये तर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे.

दुसरीकडे आज होणाऱ्या या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता. याआधी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. पण आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.