राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असं समजू लागले आहेत – उद्धव ठाकरे 

मुंबई : राज्यातील विरोधक हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे वारंवार शिवसेनेला खिंडीत गाठत असल्याचे चित्र असून हा मुद्दा किती कळीचा आहे याचा आता प्रत्यय येत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा आदेश दिला आहे.

राज ठाकरे तसेच भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असं समजू लागले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री खासदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभवही त्यांनी ऐकून घेतले आणि पुढील टप्प्यासाठी सूचना केल्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे. मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.