शिवसेना का सोडली? शिवसेना सोडताना नक्की काय झालं? राज ठाकरेंनी सांगितलं सत्य

Mumbai- गुढीपाडवा (Gudhipadwa) अर्थातच हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांचा मेळावा (Padwa Melava Live) आयोजण्यात आला. या मेळाव्यात नेहमीप्रमाणे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या शब्दांनी टीकाकारांना गपगार केले. तसेच यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर खुलासे केले. यावेळी आपण शिवसेना का सोडली?, याबद्दल मोठा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं, तुझं की माझं ह्यावर रस्सीखेच सुरु होती ते पाहताना मला त्रास होत होता. ‘शिवसेना’मी लहानपणापासून जगलो. दुसरीत असल्यापासून शर्टाच्या खिशावर शिवसेनेचा वाघ अभिमानाने मिरवायचो. शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलं होतो की ‘माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे’. मी शिवसेना सोडल्यानंतर बोललो होतो की हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नव्हतं, असे राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

पक्ष स्थापनेच्या वेळेस, खरंतर मी शिवसेना का सोडली ह्यावर बोललो असतो. पण मी बोललो नाही. शिवसेना सोडताना ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. साफ झूट. शिवसेना हे शिवधनुष्य आहे ते फक्त बाळासाहेबांना पेलवलं. एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही कळेलच, असे पुढे राज ठाकरे म्हणाले.

पुढे उद्धव ठाकरेंसोबतचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे सांगतोय, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग… मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका.. उद्धव म्हणाले की मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव ना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धवना शिवसेनेत आम्ही नको होतो, असा उलगडाही राज ठाकरेंनी केला.