नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे

नागपूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल नागपूर (Nagpur) येथील फुटाळा लेकवरच्या लेझर शोच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केलं. नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे जे काही करतात ते ‘वरुन’च करतात, माझे आणि नितीन गडकरींचे विचार जुळतात कारण आमचे विचार भव्य-दिव्य आहेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

फुटाळा लेकवरच्या लेझर शो (Laser show) पाहिल्यानंतर असे आजवर मी भारतात पाहिलेले नाही, असे जे काही पाहिले ते भारताच्या बाहेर पाहिले असं कौतुक राज ठाकरे यांनी केलं. नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. उड्डाणपूल ही वर जातो, कारंजे ही वर जातात. आमचे दोघांचे विचार मिळण्याचे कारण म्हणजे आम्ही जे काही करतो भव्यदिव्य करतो. मी जे काही आज पाहिले ते अद्भुत आहे. हे फक्त नागपूरच्या लोकांसाठी नाही तर देशातील लोकांसाठी पाहण्यासारखी गोष्ट आहे, असे कौतुक राज ठाकरे यांनी यावेळी केले.ABP माझाने याबाबत वृत्त दिले आहे.