छेडोगे तो छोडेंगे नही; राज ठाकरेंना पीएफआयची धमकी 

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पीएफआयने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे (PFI )  मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेख यांनी ही धमकी दिली आहे. देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाटेला गेलात तर सोडणार नाही हा आमचा नारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मतीन शेख यांनी सांगितले की, मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. काही लोक मुंब्य्रातील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नही’ हे आमचे घोषवाक्य आहे. तसेच भोंग्यावरून होणाऱ्या अजानबाबत त्यांनी सांगितले की, एकाही भोंग्याला हात लावला तर पीएफआय सर्वात समोर असेल. दरम्यान, पीएफआयचे आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलिसांना पत्रकही देण्यात आले आहे.