राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आजच्या विजयी मेळावा कार्यक्रमातील भाषणात शिक्षणाच्या माध्यमावरून मराठी भाषिक अस्मितेवर सवाल करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं. “आम्ही मराठी माध्यमात शिकलो, आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली. त्यामुळेच त्यांच्या मराठी प्रेमावर प्रश्न उपस्थित केला जातो. पण मग, बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघंही इंग्रजी माध्यमात शिकले होते, त्यांच्यावरही शंका घ्यायची का?” असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला.
ते पुढे म्हणाले, “शिक्षणाचं माध्यम वेगळं असलं तरी भाषेचा अभिमान मनात असावा लागतो. शिक्षण हे काही भाषिक अभिमानाचं मोजमाप ठरत नाही.”
यावेळी त्यांनी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांचं उदाहरणही दिलं. “लालकृष्ण आडवाणी हे कराचीतील सेंट पॅट्रिक हायस्कूल या ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले होते. मग त्यांच्या हिंदुत्व विचारसरणीवर कोणी शंका घेतली का? आज दक्षिण भारतात देखील अशा शाळांमध्ये शिकलेल्यांवर कोणी सवाल करत नाही,” असं सांगत राज ठाकरे म्हणाले, “उद्या एखादी व्यक्ती हिब्रू भाषेत शिकली, तरी ती मनापासून मराठीचा अभिमान बाळगू शकते. शिक्षणाचं माध्यम आणि भाषेचा अभिमान यांचा काहीही संबंध नाही.”
त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि भाषिक अस्मितेवरची संकुचित भूमिका त्यांनी स्पष्टपणे फेटाळली.