मला मराठी माणसाची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : हिंदुत्वाबरोबर मराठीचा मुद्दा लावून धरा, मराठी माणसाची मनसे मला पुन्हा दिसली पाहिजे, मराठीवर ठराविक नेत्यानेच न बोलता सर्वांनी बोला, शिवजयंती आणि गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा करा, असे निर्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी मनसेकडून शिवाजी पार्क मैदानावर भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. आगामी मुंबई, नाशिक, पुणे आणि इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी वांद्य्रातील एमआयजी सभागृहात झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, महापालिका निवडणुका केव्हा होतील हे ठावूक नसले तरी या निवडणुकांसाठी मनसैनिकांनी सज्ज रहावे. सोबत आले, तर सोबत नाहीतर आपल्याला काम करतच राहायचे आहे, असे वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावेळी केले.