धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती 

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांना मंगळवारी रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका (Heart attack)  आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अस्वस्थ्य वाटू लागल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  दाखल करण्यात आलं आहे.

धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. दरम्यान, धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. टोपे यांनी ट्विटरवरुन धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. “राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली आहे,” असं टोपे यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.