‘जुलमी सरकार झुकताना पाहायला आज राजीव सातव हवे होते’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश पर्व सोहळ्याचं निमित्त साधून देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देताना तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आता कृषी कायद्यांच्या विरोधात रान उठवणारे कॉंग्रेसचे दिवंगत नेते राजीव सताव यांची आठवण प्रकर्षाने येत आहे. कृषी सुधारणांशी संबंधित विधेयकं २० सप्टेंबर २०२० रोजी राज्यसभेत मंजुरीसाठी आल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. संसदेची नियम पुस्तिकेची प्रत फाडण्यासह सभापतींच्या टेबलावरील माईक तोडण्याचाही विरोधकांनी प्रयत्न केला. 21 तारखेला एकूण 8 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यात सर्वात पुढे राजीव सताव होते. त्यामुळे आज शेतकरी आंदोलनाला काही अंशी यश आलं असताना राजीव सताव यांच्या आंदोलांची आठवण शेतकरी करत आहेत.

काही नेटकऱ्यांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘राजीव सातव तुम्ही आज हवे होतात.. काळे कृषी व्यापार कायदे जेव्हा राज्यसभेत चर्चा न करता पारित करण्यात येत होते, तेव्हा पहिल्यांदा आवाज उठवला होता. त्याचा विरोध केला होता.आज जुलमी सरकार झुकताना पाहायला तुम्ही पाहीजेल होतात.’ असं एका युजरने ट्विटरवर म्हंटले आहे.

दरम्यान, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं उचलत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुधारावी आणि त्यांची सामजिक स्थिती चांगली व्हावी म्हणून इमानदारीने काम करत आहोत. आम्ही त्यासाठी तीन कृषी कायदे आणले होते. देशातील छोट्या शेतकऱ्यांना बळ मिळावं. त्यांना पिकांना योग्य दाम मिळावा आणि उत्पादन विक्रीसाठी बाजार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक सरकारांनी यापूर्वी त्यावर मंथन केलं होतं. यावेळीही संसदेत चर्चा झाली आणि कायदा आणला. देशातील कोट्यावधी शेतकरी आणि संघटनांनी त्याचं स्वागत केलं. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.