कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण, पत्नी शिखा राजकारणात ठेवणार पाऊल!

देशातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे 2022 मध्ये निधन झाले. कॉमेडियनच्या मृत्यूतून चाहते अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. राजू श्रीवास्तव यांची आज जयंती. त्यांच्याशिवाय त्यांचे कुटुंब पहिल्यांदाच हा खास दिन साजरा करत आहेत. अलीकडेच, राजू यांची पत्नी शिखा श्रीवास्तव (Sikha Srivastav) या एका मुलाखतीत राजू यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या भविष्यातील योजना देखील शेअर केल्या.

शिखा श्रीवास्तव यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राजकारणात येण्याचे राजू श्रीवास्तव यांचे स्वप्न होते. आता शिखाने राजू यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आहे. शिखा म्हणाल्या की- ‘राजू शेवटच्या काळात राजकारणात सक्रिय झाला होता. सपा नंतर, ते भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यासमोर अनेक योजना होत्या ज्या त्यांच्या मृत्यूने अपूर्ण राहिल्या. मला संधी मिळाली तर कदाचित मी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तथापि, हे कसे होईल आणि काय होईल याची मला कल्पना नाही.’

राजू यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होणार 
शिखा यांनी सांगितले की, राजू यांच्या जयंतीदिनी त्यांचे संपूर्ण कुटुंब कानपूरमध्ये असेल. राजू यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे ज्यात सर्वजण सहभागी होऊन महान विनोदी कलाकाराची आठवण काढतील. शिखा म्हणाल्या की तिथे सर्व काही होईल, फक्त राजू नसतील.