‘संजय राऊत यांनी हिंदुत्व वेशीला टांगत शिवसेना बारामतीकरांच्या मळ्यात दावणीला बांधली’

राम कुलकर्णी  –  1981 साली कमल हासन, रितु अग्निहोत्री (Kamal Haasan, Ritu Agnihotri) यांचा एक दुजे के लिए चित्रपट आला होता. त्यात तेरे-मेरे बीच में, कैसा है यह बंधन अंजाना, मैने नही जाना, तुने नही जाना हे गाणं गाजलं होतं. अर्थात लव स्टोरी चित्रपट कथा असली तरी महाराष्ट्राच्या वर्तमान राजकिय चित्रपटात या गाण्याची आठवण शिवसेना नेते संजय राऊताला (sanjay raut)झाली. त्यांनी म्हटलं मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात एक दुजे के लिए प्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतात. खरं तर क्षमतावान दोन माणसं एकत्रित आल्यानंतर त्या दोघात गठीत झालेलं बंधन ज्याची ओळख एकमेकांनासुद्धा नसते तर संजय राऊत कोण कुठले? खरं तर त्यांनी भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी हे गाणं गुणगुणत बसण्याची गरज आहे.

सत्तांतरा नंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस अर्थात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री जोडीची टिंगलटवाळी जखमी शिवसेना नेते संजय राऊतांनी सुरू केली. खरं तर अजुन मंत्रीमंडळ अस्तित्वात नाही. उद्या परवा विस्तार होईल. तथापि राज्यकारभार नव्या सरकारचा सुरू झाला असुन जनहिताच्या निर्णयाला प्राधान्य देताना अनेक विकासकामाचा सपाटा लावला. काही महत्वाचे निर्णय घेत असताना अतिवृष्टीचे जे संकट सद्या डोळ्यासमोर सरकारच्या आहे त्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवुन शिंदे-फडणवीसांनी कडवी नजर संकटावर ठेवली.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. शेतकर्‍यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला. एवढंच नाही छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, दि.बा.पाटील विमानतळ यासारखे निर्णय पुनश्च घेतले. कारण कायद्याच्या चौकटीत बसुन हे निर्णय ठाकरे सरकारने शेवटच्या क्षणी घेतले नव्हते. ही जोडी रोज मंत्रालयात बसुन आहे. कारण अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यातले दोन वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात दिसलेच नाहीत. शिवसेना गट फुटला. एकनाथ शिंदे बाहेर पडले. भाजपानं स्थिर सरकार असावं म्हणुन शिंदे गटाला पाठिंबा दिला. या सार्‍या घडामोडीनंतर शिवसेनेची होत असलेली वाताहत तर दुसरीकडे सत्ताधारी जोडीने कामाला दिलेली गती. हे सारं संजय राऊतांच्या डोळ्यांना खपायणा म्हणुन ते लागले तपायला.

वास्तविक पाहता उगीच बेछुट आरोप करणं आणि प्रसिद्धीसाठी बोलणं हा त्यांचा मुळ स्थायी स्वभाव. सरकार अर्थात शिंदे-फडणवीस जोडीवर आरोप करताना एक दुजे के लिए या शब्दांत टिंगलटवाळी केली पण सुमारे चाळीस वर्षापुर्वी या नावाचा चित्रपट आला ज्यात प्रसिद्ध अभिनेते कमल हासन, रितु अग्निहोत्री यांचं गाणं प्रचंड गाजलं ज्याचा उल्लेख अगोदर केला. शिंदे-फडणवीसांच्या मनातलं नातं भावबंधनात अडकुन तयार झालं ज्याला हिंदुत्वाची झालर आहे. अज्ञान संजय राऊतांना हे बंधन कधीच ओळखायला येणार नाही. कारण एका विशिष्ट अस्मितेच्या मुद्यावर ही जोडी एकत्रित आली. कारण दोघांनाही आपण एकत्रित कसे आलो? हे ओळखलंच नसेल.

प्रेम कुठलंही असो? नियत दोन जीवाला एकत्रित आणत असते. पण ज्या खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी जीवाचं रान केलं, हिंदुत्व वेशीला टांगत शिवसेना बारामतीकरांच्या मळ्यात दावणीला बांधली. दोन-अडीच वर्षाचा संसार कसाबसा झाला. म्हणुन खरं तर त्यांनी एक दुजे के लिए म्हणण्यापेक्षा भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी हे गाणं गुणगुणत बांद्रयाचा रस्ता धरायला हवा. वैफल्यग्रस्त अवस्था झाल्यानंतर नको ते शब्द वाणीला येतात आणि मग अशा वेळी बेताल वक्तव्य होत रहातात. त्यांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे झाली असंच म्हणावे लागेल.