‘संविधान दिन कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान’

मुंबई : संविधान हे भारतीय लोकशाहीचा प्राण आहे. संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारताला दिले आहे.भारतीय संविधान दिन गौरव कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे हा संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याची वेळ जेंव्हा जेंव्हा येते तेंव्हा तेंव्हा काँग्रेसने पाठ दाखविली आहे.

आजही संविधान दिनावर बहिष्कार टाकून काँग्रेसने आपला खरा चेहरा दाखविला आहे. संविधान दिना वर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षाच्या या वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

आज संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधानदिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे चूक आहे. संसदेतील कार्यक्रम हा भाजप चा कार्यक्रम नव्हता तर लोकसभा अध्यक्षांनी सर्व संसद सदस्यांना निमंत्रित करुन आयोजित केलेला निष्पक्ष राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात भारतीय लोकशाहीला मजबूत करणाऱ्या संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे हे विरोधी पक्षाची वृत्ती निंदनीय आहे आशा शब्दांत तीव्र संताप रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद,उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संविधानाचा आणि संविधानाचे प्रमुख शिल्पकार म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या गोदानाचा गौरव केल्याबद्दल रामदास आठवले यांनी आभार मानले आहेत.

विविध जाती धर्म भाषा प्रांत अशी अनेकविध विविधता असताना देशाला एकजूट ठेवणारे आपले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानामुळे आपली लोकशाही आणि आपले राष्ट्र एकसंघ मजबूत उभे आहे असे रामदास आठवले म्हणाले.

हे देखील पहा