मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीला रामदास आठवले यांचा विरोध

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, दुसरीकडे हे भोंगे ( Loudspeaker On Mosque ) उतरवू नयेत, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं ( Ramdas Athawle Supports Mosque Loudspeakers ) आहे. दरम्यान, मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत याबाबत भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपली भूमिका मांडली होती. परंतु आता आरपीआयने भोंग्याला समर्थन दिल्याने भाजप याबाबत काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे.