‘बाळासाहेबांची शपथ घेणं चूकीचं, राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती’

मुंबई – पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची टीम (Enforcement Directorate) दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘ईडीने कारवाई केली तरीही शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही’ असं म्हणत संजय राऊत यांनी ईडीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणामुळे (Patra Chawl Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले होते. ईडीने संजय राऊत यांची चौकशीही केली होती. पण आज सकाळी अचानक ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक तळ ठोकून आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी ईडी करावाईच्या पार्श्वभूमीवर तीन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. तर त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमधून ईडी आणि भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र अंस संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. असे संजय राऊत हे आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.

दरम्यान, संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती असा टोला शिवसेना नेते रामदास कदमांनी (Ramdas Kadam) लगावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजप सोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचे रामदास कदमांनी सांगितले आहे.

युती केली मात्र, ज्यावेळी निधीवाटपात शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी का यांनी आपला स्पष्टोक्तेपणा दाखवला नाही. त्यांनी आपला स्वार्थ साधला आणि आमदारांना वाऱ्यावर सोडले. उध्दव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेतल त्यांनी ही सर्व जुळवाजुळव केल्याने महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याचे कदमांनी सांगितले आहे.