Ramesh Chennithala | घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा

Ramesh Chennithala | घाटकोपर मध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केली आहे.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रितिनिधी नाहीत कारण सरकारने निवडणूकच घेतलेली नाही. सर्व कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी चालवत आहेत. घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना गंभीर असून या घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आ. प्रा. वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एस. संदीप, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप