राणे कुटुंबाचा आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा डाव होता, केसरकर यांच्या आरोपांमुळे खळबळ 

मुंबई : राज्याच्या राजकारणात ठाकरे आणि राणे यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे.  सत्तापालटानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय तसेच ठाकरेंकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. अशावेळी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात अजून एक ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, पण नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे.

केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे बोलले जाते आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की, सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. ठाकरे कुटुंबीयांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात, ते यामुळे दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारले होते की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले होते की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.

आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते.

भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले, असं केसरकरांनी सांगितलं.