‘अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे’

पुणे – गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे अभूतपूर्व संकट आल्यापासून जनता पूर्ण पिचून निघाली आहे. त्यात अस्मानी संकटाबरोबर बोलघेवडे सरकार नशिबी आल्याचा महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आले आहे अशी घन्घाती टीका आम आदमी पार्टीचे नेते रंगा राचुरे यांनी केली आहे.

ते म्हणाले, समजूतदार कुटुंब प्रमुखाची भाषा बोलत जनतेला सहन करण्याचे आवाहन करणारे मुख्यमंत्री आणि तिघाडे सरकारने जनतेचे रोजगार , कोरोना उपचार , शैक्षणिक फी चा तगादा , वीजबिल सवलत , महागाई , गृहखाते अपयश , महिला अत्याचार , या सर्वच आघाडीवर निष्क्रिय ठरले असल्याने जनतेसाठी महाविकास आघाडी महात्रासाची ठरली आहे.

गेल्या दोन वर्षातील जनतेच्या अपेक्षांची यादी मोठी आहे . घरकामगार , रिक्षा चालक असो किंवा विद्यार्थी असो, शेतकरी असो किंवा असंघटीत क्षेत्रातील कामगार , लघु उद्योजक .. या सर्वांच्या वाट्याला अत्यंत कठीण काळ आला आहे. अजूनही आर्थिक चक्र व्यवस्थित सुरु झाले नाही. अश्या वेळेस लोकसंख्येच्या आर्थिक स्थरातील खालच्या गटाला आर्थिक मदत देण्यात हे सरकार अपयशी ठरले. राज्यातील ३५ लाख घर कामगार महिलांपैकी एक लाख महिलांनापण १५०० रुपयाची किरकोळ मदतही मिळू शकली नाही. इतर सर्व राज्यात खाजगी शाळा फी सवलत दिली गेले पण महाराष्ट्रात मात्र ही पालकांची चेष्टा ठरली. तर वीजबिल सवलतीबाबत चे ‘यु टर्न’ जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले . पेट्रोल , डीझेल भाव वाढी बाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवी मुळे जनतेला या जुगलबंदी वर हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे. कोरोना काळात रुग्णाच्या लुटीचे आकडे या सरकारचे प्रशासकीय अपयशच दाखवते. हि अपयशाची यादी मोठी आहे.

राजकीय इच्छाशक्ती आणि नियत याचा अभाव असणारे हे आघाडी सरकार विरुद्धचा जनतेचा आवाज,शेतकरी आंदोलनातून, एसटी कामगारांच्या संपातून दिसून येतो आहे. त्यामुळे या आधीच्या भाजप सरकारच्या ‘आगीतून महाविकास च्या फुफाट्यात’ अशी जनतेची अवस्था झाली आहे अशी प्रतिक्रिया आपचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली आहे.