शिंदेंचे आश्वासन म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा रोष शांत करून आंदोलनाची धार बोथट करण्याचा सरकारचा डाव ?

Solapur – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राजु शेट्टी यांच्या मागणीनुसार मागील महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेले प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात या सरकारच्या विरोधात आज कोल्हापूरात एक मोर्चा पार पडणार आहे. खरंतर राजू शेट्टींनी मोर्चाची हाक दिली आणि दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून आश्वासन देऊन टाकले. परंतु याबाबत स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणुन घेतली असता त्यांनी हे आश्वासन म्हणजे फक्त शेतकऱ्यांचा रोष शांत करून आंदोलनाची धार बोथट करण्याचा या सरकारचा डाव आहे तो आम्ही उलथून लावू असे ते म्हणाले.

याच विषयी स्वाभिमानीचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वताःच्या पक्षप्रमुखांना फसवून झालेले मुख्यमंत्री आणि 2014-19 च्या सरकारमध्ये फक्त घोषणेपुरती फसवी कर्जमाफी करणारे सध्याचे उपमुख्यमंत्री हे दोघेही लबाड आहेत हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळे जोवर शासकीय निर्णय होवुन त्याच्या अंमलबजावणीस सुरूवात होवुन नियमित कर्जफेड करण्याऱ्या शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदान जमा होत नाही तोवर आदरणीय राजु शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात  स्वाभिमानी शेतकरी संघटना&  राज्यभर आंदोलनाचा भडका उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही स्वाभिमानीची भुमिका आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले..

तसेच पुढे बोलताना बागल म्हणाले, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकऱ्यांना मागील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने अनुदान देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु हे सरकार जाणूनबुजून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब करत आहे. यातुन श्रेय वादासाठी सत्ताधारी निर्णय प्रलंबित ठेवत आहेत आणि त्यामुळे सध्या अतिवृष्टी आणि खते बीबियाणे यांच्या दरवाढीने मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे या निर्णयाची लवकर अंमलबजावणी न झाल्यास स्वाभिमानी राज्यभर या सरकारविरोधात आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल त्यावेळी आम्ही राज्यातील शेतकऱ्यांच्या वज्रमुठीपुढे सरकारला झुकायला भाग पाडु असेही बागल यावेळी बोलताना म्हणाले.