INDvAUS: कसोटीच्या पहिल्याच दिवशी वाद, जडेजाने केली बॉल टेंपरिंग? ऑस्ट्रेलियाकडून होतायत आरोप

नागपूर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात नागपूरच्या व्हीसीएस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. काल (०९ फेब्रुवारी) या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ ११७ धावांवरच गुंडाळला गेला. भारतीय संघाचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) या सामन्याद्वारे संघात पुनरागमन करत शानदार गोलंदाजी केली. मात्र त्याच्या एका कृतीमुळे त्याच्यावर बॉल टेंपरिंगचा (Ball Tempering) अर्थातच चेंडू छेडछाडचा आरोप करण्यात आला.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट फॉक्स क्रिकेटने जडेजाशी संबंधित एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. फॉक्स क्रिकेटने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मजेदार. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीदरम्यान प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक बाब समोर आली असून, त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये रवींद्र जडेजा चेंडू फेकण्यापूर्वी सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजकडे जातो आणि त्याच्याकडून बामसारखी वस्तू घेतो आणि बोटांना लावतो, असे या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.’

आयसीसीच्या नियमांनुसार, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकांकडून चेंडूवर काहीही लावण्यास मनाई आहे आणि असे करणे चेंडू छेडछाडच्या श्रेणीत येते. व्हिडिओत जडेजा चेंडूला काहीही लावताना दिसत नाहीये. मात्र ऑस्ट्रेलियन मीडिया मुद्दाम या मुद्द्याला मोठा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या प्रकरणी सोशल मीडियावर चर्चांनी जोर धरल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला सामना रेफरींनी बोलावले होते. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार रोहितला ही व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. व्हिडिओत जडेजा त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या तर्जनीवर वेदना कमी करणारी क्रीम वापरताना दिसला. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्येही तो चेंडूला काहीही लावताना दिसत नाही. तो केवळ हातावर क्रिम लावताना दिसत आहे. परिणामी जडेजावर कोणतेही आरोप लावण्यात आले नाहीत.