‘रावत यांनी आपल्या मायभूमीची पूर्ण निष्ठेनं सेवा केली,त्यांचं योगदान आणि निष्ठा शब्दांत सांगता येत नाही’

नवी दिल्ली- देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपिन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “आज देशासाठी एक फार दु:खदायक दिवस आहे. कारण आपण एका दुर्दैवी घटनेमध्ये आपले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना गमावलं आहे. ते सर्वात शूर सैनिकांपैकी एक होते. ज्यांनी आपल्या मायभूमीची पूर्ण निष्ठेनं सेवा केली आहे. त्यांचं योगदान आणि निष्ठा शब्दांत सांगता येत नाही. मला खूप वेदना होत आहेत”, असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.