‘आरडी’ योजना आहे बचत खात्याहून अधिक फायदेशीर
जाणून घ्या काय आहे ' आरडी ’ योजना
पुणे : सध्याच्या महागाईच्या काळात सामान्य गरजा देखील पूर्ण करण्यासाठी हजारोंची किंमत मोजावी लागते . अशात कोरोना सारखे आजार खिशाला मोठे भगदाड पाडतात. अशावेळी हेल्थ इन्शोरन्स उपयोगी पडतो . परंतु इतर खर्च जसे शिक्षण , लग्न यासाठी दर महिन्याला आपल्या ऐपतीप्रमाणे बचत करणे खूप गरजेचे झाले आहे .
यासाठी अनेक पर्याय देखील बँक उपलब्ध करून देते . आज आपण माहिती घेणार आहोत ते बँकांची आवर्ती ठेव योजना (आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट) योजनेची …बँकांची आवर्ती ठेव योजना (आरडी अर्थात रिकरिंग डिपॉझिट) ही बचत खात्याहून अधिक फायदेशीर ठरते.
१. आरडीसाठी कमीत कमी कालावधी सहा महिन्यांपासून कमाल 10 वर्षांंपर्यंत असू शकतो.
२. जवळच्या पोस्टात किंवा बँकेच्या शाखेत जावून त्या योजनेत आपण पैसे गुंतवण्यास सुरुवात करू शकतो.
३. सध्या या योजनेवर साधारणतः वार्षिक पाच ते साडे सहा टक्के दराने व्याज दिले जात आहे.
४. आरडीत संयुक्त खाते आणि नॉमिनीची सुविधा असते. अचानक पैशाची गरज भासल्यास मुदतठेवींप्रमाणेच आरडीमधूनही पैसे काढून घेता येतात.
५. आरडी योजना ही म्युच्युअल फंडच्या एसआयपीप्रमाणेच काम करते.या योजनेमध्ये दरमहा स्तरावर व्याज जमा केले जाते. विशेष म्हणजे आपण ज्या दरावर योजना सुरू केली, तो व्याजदर योजना संपेपर्यंत कायम राहतो. उदाहरणार्थ, आपण पोस्टात एक जानेवारीपासून दरमहा 5000 रुपयाचे रिकरिंग सुरू केले असेल आणि त्यावर 5.8 टक्के व्याजदर दिले जात असेल तर पाच वर्षांपर्यंत हाच व्याजदर कायम राहतो. यानुसार आपल्याला पाच वर्षांनंतर 3.48 लाख रुपये मिळतील.
६. यादरम्यान व्याजदरात घसरण झाली तरी त्याचा या योजनेवर परिणाम होणार नाही.
७. सध्या विविध बँक आपल्या आरडी योजनांवर वार्षिक 4.45 ते 6.50 टक्के व्याज देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना एक ते अर्धा टक्का जादा व्याज देत आहेत.हल्ली वेबसाईट किंवा बँकेच्या अॅपद्वारेही आरडी सुरू करता येते.
८. आरडीमध्ये आपण निर्धारीत केलेली रक्कम त्या-त्यावेळी जमा करणे आवश्यक असते. ती भरली न गेल्यास खाते बंदही केले जाऊ शकते.
९. सद्यस्थितीत इंडसइंड बँक 6 टक्के, पोस्ट ऑफिस 5.80 टक्के, स्टेट बँक 5.00 टक्के, पंजाब नॅशनल बँक 5.00 टक्के, आयसीआयसीआय बँक 4.9 टक्के असे आरडीवरील वार्षिक व्याजदर आहेत. तीन वर्षांसाठी आरडी खाते सुरू केल्यास पाव टक्का आणि पाच वर्षांसाठी सुरू केल्यास अर्धा टक्का अधिक व्याजदर मिळू शकतो.
१० . मुदतीपूर्वी आरडी खाते बंद केल्यास दंड आकारणी केली जाऊ शकते.