शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांचा धनादेश प्राप्त

पुणे, दि. २४ मार्च, २०२३ : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव (बु) येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’साठी (Shivsrushti) राज्यसरकारतर्फे साल २०२२-२३ मधील पुरवणी मागण्यांदरम्यान मंजूर झालेल्या ५० कोटी रुपयांचा धनादेश महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानला आज प्राप्त झाला. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जगदीश कदम यांकडे सदर धनादेश सुपूर्त केला. पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देखील या वेळी उपस्थित होते.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान (Maharaja Shivchatrapati Pratishthan) तर्फे न-हे – आंबेगाव (बु) येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’चा पहिला टप्पा असलेला सरकारवाडा (Sarkar Wada) पूर्ण झाला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) याचे लोकार्पण संपन्न झाले होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भवानी माता मंदिर, गंगासागर आणि रंगमंडल उभारण्याचा प्रतिष्ठानचा मानस असल्याचे जगदीश कदम (Jagdish Kadam) यांनी सांगितले. सदर कामे ही पुढील वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होताना त्या वर्षाचा समारोप होत असताना पूर्ण होतील असेही त्यांनी नमूद केले.