देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या, अमृता फडणवीसांची मागणी

पुणे –   माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस  (Amrita Fadnavis) यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ (Prostitution business) म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. भाजप (BJP) नेहमीच तुमच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना यावेळी बोलून दाखवलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या, मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी.

तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका. असं देखील त्यांनी सांगितले.