मुंबई – मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर दाऊद वानखेडे याची भेट घेऊन ज्या पध्दतीने मिडिया ट्रायल केली यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत असून वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला एवढी घाई का आहे? ते असे वर्तन का करत आहेत असे अनेक सवाल करतानाच या सगळ्या प्रकाराची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर दाऊद वानखेडे यांची बाजू घेत समर्थन केले हे दुर्दैवी आहे. हलदर हे भाजपाचे नेते आहेत मान्य आहे परंतु त्यांना जे पद मिळाले आहे त्या पदाची जबाबदारी आणि कार्य व कर्तव्य काय आहे. आयोगाची कार्यप्रणाली कशी आहे. ज्या पदावर बसलो आहे त्या पदाचे वर्तन कसे हवे हे समजले पाहिजे असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
देशात के. रामास्वामी जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी देशात जातीच्या दाखल्याचे बोगस प्रकरणे मोठ्याप्रमाणावर बाहेर येऊ लागल्यावर सन १९९४ मध्ये देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
मला अट्रोसिटी कायद्यांतर्गत आत टाकण्याची धमकी समीर वानखेडे याने दिली आहे. जो व्यक्ती दलितच नाही. तो धमकी देत आहे. तो जरा जास्तच बोलत आहे. सर्व व्यक्तींनी आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. आपल्या पदाची गरीमा सांभाळली पाहिजे असे सांगतानाच दुसर्याच्या अधिकाराचे हनन करण्याचा अधिकार नाही याचीही तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी नको त्या गोष्टींवर चर्चा केली. खोटं बोलायचं असेल तर ढंगात बोला जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल. आजपण मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे. फर्जीवाडा करुन समीर दाऊद वानखेडे याने सर्टिफिकेट बनवले. त्याचे सर्टिफिकेट मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली असून या समितीसमोर माझे म्हणणे मांडणार आहे. या समितीसमोर जो फर्जीवाडा झालाय त्यावर चौकशीनंतर शिक्कामोर्तब होणार आहे. एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर कायद्यानुसार कारवाई होईल असेही नवाब मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नी यांनी मुंबई नदी सरंक्षण अभियानातंर्गत एक गाणे तयार केले होते. यामध्ये सोनू निगम यांनी गाणे गायले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने अभिनयासहीत गाणे देखील गायले होते. देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या गाण्यात अभिनय केला होता.
फडणवीसजी आणि मुनगंटीवारजी अभिनय क्षेत्रात उतरले ही चांगली गोष्ट आहे. मात्र या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. त्यामुळे जयदीप राणाला ओळखत नाही, अशी पळवाट भाजपच्या नेत्यांना घेता येणार नाही. यासोबतच नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचा गणपती दर्शन घेतानाचा आणखी एक फोटो बाहेर काढला. त्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.
सार्वजनिक जीवनात कुणी कुणाबरोबरही फोटो काढू शकते. मात्र फोटो काढताना ज्यापद्धतीची पोझ दिली आहे, त्यावरुन फोटोतील व्यक्ती एकमेकांना चांगले ओळखत असल्याचे दिसून येते असेही नवाब मलिक म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा एक ‘वाझे‘ मुंबईत राहतो, हे मी आधीच सांगितले होते. निलेश गुंडे नामक व्यक्तीचे माजी मुख्यमंत्र्यांसहीत घनिष्ठ संबंध होते, गुंडे याला मुख्यमंत्री निवास, मंत्रालय सर्व ठिकाणी प्रवेश होता. पोलिसांच्या बदल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या गुंडेमार्फत होत होत्या. त्यामाध्यमातून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच फडणवीस जेव्हा पुण्याकडे प्रस्थान करायचे तेव्हा ते गुंडे यांच्या नवी मुंबईतील घरी जाऊन भेट द्यायचे. तिथूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
भाजपचे सरकार बदलल्यानंतर सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात हाच ‘फडणवीसांचा वाझे‘ फिरताना दिसला आहे. समीर दाऊद वानखेडे हा मागच्या १४ वर्षांत याच शहरात विविध भागात काम करत आहे. त्याची बदली करण्यामध्येही फडणवीस यांचा हात आहे. निरपराध लोकांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी वानखेडे यांना आणले गेले, असा आरोपही मलिक यांनी केला.
मोठमोठे ड्रग पेडलर तसेच काशिफ खान, रिषभ सचदेवा, आमिर फर्नीचरवाला, प्रतीक गाभा यांना सोडून देण्यात आले होते. फडणवीस यांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा व्यवसाय सुरु आहे. प्रतीक गाभा हा कोण आहे? तो कुणासाठी पार्ट्या आयोजित करतो? हे सर्व येणाऱ्या दिवसात आम्ही जगजाहीर करु, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.
पुढील काही दिवसांत आणखी ड्रग्ज पेडलर लोकांचे फोटो आम्ही समोर आणणार आहोत, ज्यांचा भाजपशी संबंध आहे, असेही नवाब मलिक यांनी जाहीर केले.
https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0