वसीम रिझवीला मोकळीक दिल्याने देशातील वातावरण बिघडतंय – मलिक

मुंबई – आंदोलन करणं हा अधिकार आहे परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्‍या लोकांवर सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

दरम्यान वसीम रिझवी हे देशातील वातावरण बिघडेल असे कुठलेही विधाने अथवा लिखाण करणार नाही याची दक्षता केंद्रसरकारने घ्यावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

त्रिपुरा येथे जी हिंसा झाली. वसीम रिझवी यांनी जे पुस्तक लिहिले आहे त्याविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. यादरम्यान नांदेड आणि इतर ठिकाणी हिंसा झाली असून या हिंसेचे कठोर शब्दात निंदा करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

आंदोलन व निषेध करणे हा लोकांचा अधिकार आहे परंतु चुकीच्या पध्दतीने आवाहन करणे व त्यावर नियंत्रण नसणे हे योग्य नाही. हिंसा होणार नाही ही जबाबदारी आयोजकांची असते मात्र काल जे घडले ते योग्य नाही. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे परंतु लोकांनी शांतता ठेवावी असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

वसीम रिझवी हे गेल्या दोन – चार वर्षात या देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबतची विधाने करत आहेत. पुस्तके लिहित आहेत. भावना दुखावेल असे कृत्य करत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. नियोजन पद्धतीने देशाचे वातावरण कसे बिघडेल असा प्रयत्न वसीम रिझवीच्या माध्यमातून सुरू आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

वसीम रिझवी हे सिया वक्फ बोर्डाचे चेअरमन असताना त्यांनी गैरव्यवहार केला होता. २०१६-१७ मध्ये युपी पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर सिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले मात्र ते प्रकरण कोल्ड स्टोरेज मध्ये सीबीआयने ठेवले आहे आणि वसीम रिझवीला वादग्रस्त वक्तव्य करायला मोकळीक देण्यात आल्याने देशातील वातावरण बिघडत आहे त्यामुळे वसीम रिझवीवर तात्काळ कारवाई करा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.