रिलायन्स इंडस्ट्रीजने न्यूयॉर्कचे आलिशान हॉटेल मँडरिन ओरिएंटल खरेदी करण्यासाठी केला करार

मुंबई –  रिलायन्स इंडस्ट्रीजने न्यूयॉर्कचे प्रीमियम लक्झरी हॉटेल मंदारिन ओरिएंटल न्यूयॉर्क सुमारे 735 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला आहे. हे हॉटेल प्रसिद्ध बॉलरूम, पंचतारांकित स्पा, एमओ लाउंज आणि उत्तम जेवणासाठी ओळखले जाते.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये बांधलेले 248 खोल्या आणि सुट असलेले हे प्रसिद्ध लक्झरी हॉटेल शहराच्या सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलला लागून आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने शनिवारी संध्याकाळी याबाबत शेअर बाजाराला सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) ने कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (केमन) चे संपूर्ण भाग भांडवल खरेदी करण्यासाठी करार केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (केमन) ही केमन बेटांवर स्थापन झालेली कंपनी आहे. न्यूयॉर्कच्या प्रिमियम हॉटेल्सपैकी एक असलेल्या मॅन्डरिन ओरिएंटल न्यूयॉर्कमध्ये त्याची 73% भागीदारी आहे. रिलायन्सने ते $980 दशलक्ष (सुमारे 735 कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्याचा करार केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज एका वर्षापेक्षा कमी कालावधीत असे आणखी एक हॉटेल विकत घेत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी यूकेची स्टोक पार्क लि. विकत घेतली होती. रिलायन्सची भारतात तेलापासून दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात मोठी कंपनी आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील समूहाकडे २.६ लाख कोटी रुपये रोख आहेत.