“…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकाल्यानंतर वसंत मोरेंची संतप्त प्रतिक्रिया

पुणे : मागील काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र (Threatening letter) मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे (Vasant More) यांनी भव्य रोजगार मेळावा (Employment fair) घेतला होता. या मेळाव्याचे सर्व नियोजन हे मोरेंचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्याकडे होते. या कार्यक्रमादरम्यान एका शाळेच्या आवारात रुपेश मोरे यांची चारचाकी गाडी लावण्यात आली होती. याच ठिकाणी गाडीच्या वायपरमध्ये ‘सावध राहा रुपेश’ अशी चिट्ठी ठेवण्यात आली आली होती. याबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घडामोडी घडल्यानंतर आता वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली असून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणाले, मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो…आमचेही अगदी तसंच आहे,पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही… राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते,पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे.

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली,त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये सावध रहा रुपेश आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली…तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही… भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत…तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय…बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे…!