‘जरा लाज वाटूद्या’, सोशल मीडियावर रक्तबंबाळ पंतचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर भडकली रोहितची पत्नी

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh pant Accident) याच्या कारचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीहून उत्तराखंडला जात असाताना गाडी चालवताना झोप लागल्याने रुरकी येथे त्याची गाडी डिव्हाइडरला धडकली आणि कारने पेट घेतला. परंतु वेळीच पंतने गाडीतून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंतचा अपघात झाल्यानंतर त्याच्या कारचे आणि त्याचे जखमा झालेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याचे फोटो व व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर (Rishabh Pant Accident Clips) शेअर केले. रक्तबंबाळ झालेल्या पंतचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर टाकल्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी (Rohit Sharma Wife) रितीका सजदेह चांगलीच वैतागली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आपला त्रागा व्यक्त (Ritika Sharma Angry) केला आहे.

रोहित शर्माच्या पत्नीने काय लिहिले?
रितिकाने (Ritika Sajdeh) लिहिले – कोणीतरी जखमी झाले आहे आणि तुम्ही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. त्याला (पंत) असे फोटो किंवा व्हिडिओ हवे आहेत की नाही हे ठरवता येत नाही. हे फोटो पाहून त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार प्रभावित होऊ शकतात. रितीका सध्या पती रोहित शर्मा आणि मुलगी समायरासोबत सुट्टीवर आहे. आज समायराचा चौथा वाढदिवस आहे.

बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबद्दल दिले अपडेट
पंतच्या (Rishabh Pant Health Update) अपघाताबाबत बीसीसीआयने (BCCI) निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, ऋषभ पंतच्या डोक्याला दोन कट आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर घर्षणाची जखम आहे. पंतची प्रकृती स्थिर असून त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच वेळी, त्याच्या जखमा शोधण्यासाठी आणि त्याच्या पुढील उपचारांसाठी एमआरआय स्कॅन केले जाईल.

बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे, तर वैद्यकीय पथक ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी आणि या वेदनादायक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी याची बोर्ड काळजी घेत आहे.